भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव सध्या शिगेला पोहोचला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर सीमेवर जरी शांतता दिसत असली, तरी दोन्ही देशांमधील तणाव कमी झालेला नाही. अशातच शनिवारी, 17 मे 2025 रोजी एक मोठी बातमी समोर आली. हरियाणातील प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्राला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तिच्यावर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आणि भारतातील संवेदनशील माहिती शत्रू देशाला पुरवल्याचा गंभीर आरोप आहे. ज्योतीसोबतच या प्रकरणात आणखी सहा जणांना अटक झाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, हे सर्वजण पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था ISI च्या संपर्कात होते. चार दिवसांपूर्वीच भारत सरकारने नवी दिल्लीतील पाकिस्तानी हाय कमिशनच्या एका अधिकाऱ्याला हेरगिरीच्या आरोपाखाली देशाबाहेर हाकलल होत. आता त्या अधिकाऱ्याशी संबंध असलेल्या भारतीय नागरिकांना अटक झाल्याने हेरगिरीच एक मोठ रॅकेट असल्याची शक्यता समोर आली आहे. ज्योती मल्होत्रा नेमकी कोण आहे? ती हेरगिरी कशी करत होती? आणि या प्रकरणात कोण-कोण सामील आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत.
ज्योती मल्होत्रा – कोण आहे ही युट्यूबर?
33 वर्षीय ज्योती मल्होत्रा ही हरियाणातील हिस्सारची रहिवासी आहे. ती एक युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून ओळखली जाते. हिस्सारच्या घोडा फार्म रोडवर तिच घर आहे. ज्योती आधी गुरुग्राममधील एका खाजगी कंपनीत नोकरी करत होती, पण कोविड-19 च्या काळात तिची नोकरी गेली. त्यानंतर तिने युट्यूबर बनण्याचा निर्णय घेतला.
ज्योतीचं ‘Travel With Jo’ नावाच एक युट्यूब चॅनल आणि इन्स्टाग्राम अकाउंट आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर 1 लाख 30 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत, तर युट्यूब चॅनलवर 3 लाख 77 हजारांहून जास्त सबस्क्रायबर्स आहेत. ज्योती वेगवेगळ्या ठिकाणी फिरून तिथले अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करते. तिचे व्हिडिओ प्रेक्षकांना खूप आवडतात, आणि ती एक यशस्वी कंटेंट क्रिएटर म्हणून प्रसिद्ध झाली होती.
पण 15 मे 2025 रोजी हिस्सार पोलिसांनी तिला अटक केली. पोलिसांचा दावा आहे की, ज्योती पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात होती, आणि ती भारतातील गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवत होती. ज्योतीने याआधी चार वेळा पाकिस्तानला भेट दिली आहे, ज्यामुळे ती भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आली होती.
अटकेची कारवाई आणि आरोप
ज्योती मल्होत्राला 15 मे 2025 रोजी हिस्सारमधून अटक करण्यात आली. हिस्सारच्या सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 152 आणि ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्ट 1923 च्या कलम 3, 4 आणि 5 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात ज्योतीकडून लेखी कबुली जबाब मिळाला आहे, आणि हे प्रकरण आता हिस्सारच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आल आहे.
17 मे रोजी पोलिसांनी ज्योतीला न्यायालयात हजर केल, आणि तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, ज्योतीने 2023 मध्ये पाकिस्तानला भेट दिली होती, आणि तिथे तिची ओळख नवी दिल्लीतील पाकिस्तानी हाय कमिशनमधील कर्मचारी एहसान उर रहीम उर्फ दानिश याच्याशी झाली. लवकरच या दोघांमध्ये जवळचे संबंध निर्माण झाले, आणि दानिशच्या माध्यमातून ज्योतीचा संपर्क आयएसआयच्या इतर एजंट्सशी आला.
यामध्ये अली एहसान आणि शाकीर उर्फ राणा शहबाज यांचा समावेश होता. ज्योतीने शाकीरचा नंबर तिच्या फोनमध्ये ‘जाट रंधावा’ या नावाने सेव्ह केला होता. ती Whatsapp, Telegram आणि Snapchat च्या माध्यमातून या एजंट्सशी संपर्कात होती. तिच्यावर भारतातील संवेदनशील ठिकाणांची माहिती पाकिस्तानला पाठवण्याचा आणि सोशल मीडियावर पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा तयार करण्याचा आरोप आहे.
ज्योती आणि पाकिस्तान – एक संशयास्पद संबंध
ज्योती मल्होत्राने चार वेळा पाकिस्तानला भेट दिली होती. दोन वेळा ती शिख भाविकांच्या जत्थ्यासोबत गेली, तर एकदा तिने कर्तारपूर साहेब कॉरिडोर मार्गाचा वापर केला. याशिवाय ती एकदा वैयक्तिकरित्या पाकिस्तानात गेली होती. या भेटींमध्ये तिने पाकिस्तानी हाय कमिशनला भेटी दिल्या, आणि तिथल्या अनेक उच्च अधिकाऱ्यांना भेटली. या ट्रिप्सची माहिती तिने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली होती.
ज्योतीला सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याची जबाबदारी देण्यात आली होती, ज्याचा वापर पाकिस्तान भारताविरुद्ध प्रचार आणि हेरगिरीसाठी करत होता. ज्योती नुकतीच एका क्रिकेट सामन्यासाठी पाकिस्तानात गेली होती, आणि त्या ट्रिपचा खर्च तिथल्या एका व्यक्तीने उचलला होता. यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणांचा तिच्यावरचा संशय वाढला, आणि अखेरीस 15 मे रोजी तिला अटक झाली. ज्योतीच्या पाकिस्तानमधील व्हिडिओजना लाखो व्ह्यूज मिळाले होते. लोक हे व्हिडिओ मनोरंजनासाठी पाहत होते, पण त्यामागे हेरगिरीचा एक मोठा डाव सुरू होता.
हेरगिरीचं रॅकेट – ज्योती एकटी नव्हती
या प्रकरणात ज्योती मल्होत्रा एकटी नव्हती. तिच्यासोबत आणखी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या हेरगिरीच रॅकेट चालवणारी मुख्य व्यक्ती होती एहसान उर रहीम उर्फ दानिश. दानिश हा नवी दिल्लीतील पाकिस्तानी हाय कमिशनमध्ये काम करत होता. 13 मे 2025 रोजी भारत सरकारने त्याला हेरगिरीच्या आरोपाखाली ‘पर्सोना नॉन ग्रेटा’ घोषित करून 24 तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश दिले होते. दानिशचे पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयशी थेट संबंध होते. त्याच्यावर भारत-पाकिस्तान तणावादरम्यान पंजाबमधील भारतीय लोकांशी संपर्क साधून भारतीय सैन्याच्या हालचालींची माहिती गोळा करण्याचा आरोप होता.
या प्रकरणात अटक झालेली दुसरी व्यक्ती आहे गुजाला. 32 वर्षीय गुजाला ही पंजाबमधील मालेर कोठलाची रहिवासी आहे, आणि ती विधवा आहे. 27 फेब्रुवारी 2025 रोजी तिने व्हीजासाठी अर्ज करण्यासाठी नवी दिल्लीतील पाकिस्तानी हाय कमिशनला भेट दिली होती. तिथे तिची ओळख दानिशशी झाली, आणि दोघांमध्ये नियमित संपर्क सुरू झाला. दानिशने तिला लग्नाच आमिष दाखवून प्रेमसंबंध प्रस्थापित केले, आणि नंतर तिच्याकडून गोपनीय माहिती मिळवायला सुरुवात केली. गुजालाला या माहितीच्या बदल्यात 30 हजार रुपये मिळाले होते, जी रक्कम तिला मार्च 2025 मध्ये यूपीआयद्वारे हप्त्यांमध्ये पाठवण्यात आली होती. एप्रिलमध्ये गुजाला आणि दानिश यांची प्रत्यक्ष भेट झाली, आणि तिने भारतीय सैन्याच्या हालचालींची माहिती दानिशला दिली.
इतर आरोपी – हेरगिरीचं जाळ
या प्रकरणात पोलिसांनी आणखी काही जणांना अटक केली आहे. यामीन मोहम्मद नावाच्या व्यक्तीला 9 मे रोजी अटक झाली. यामीनने गुजालाला दानिशकडून पैसे मिळवून देण्यासाठी मदत केली होती. चौकशीदरम्यान समजल की, यामीन 2018 आणि 2022 मध्ये पाकिस्तानला गेला होता, आणि त्याचे आयएसआयशी जुने संबंध होते.
हरियाणाच्या नूंह जिल्ह्यातील राजाका गावातील अरमान नावाच्या व्यक्तीला 17 मे रोजी अटक झाली. अरमानने पाकिस्तानी एजंट्सना भारतीय सिम कार्ड्स उपलब्ध करून दिली होती, आणि डिफेन्स एक्सपो साइटची पाहणी करून त्याची माहिती पाठवली होती. तो 2023 पासून पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता. पानिपत पोलिसांनी नोमान इलाही नावाच्या व्यक्तीला 14 मे रोजी अटक केली.
नोमान मूळचा उत्तर प्रदेशातील कैराणाचा आहे. त्याचे वडील नकली पासपोर्ट बनवण्याच काम करायचे, आणि त्यांच्या मृत्यूनंतर नोमानने हे काम सुरू केल. तो पाकिस्तान आणि इतर मुस्लिम देशांमधील लोकांसाठी नकली पासपोर्ट बनवायचा, आणि आयएसआय हँडलर इकलाब उर्फ काना याला गोपनीय माहिती पुरवायचा. त्याने पंजाब आणि हरियाणातील संवेदनशील ठिकाणांचे व्हिडिओ बनवून ते पाठवले होते. हरियाणाच्या कैथलमधून देवेंद्र सिंग नावाच्या व्यक्तीला अटक झाली.
देवेंद्रने पाकिस्तानातील शिख धर्मस्थळांना भेट दिली होती, आणि तिथे एका तरुणीने त्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवल. त्या तरुणीने त्याला हेरगिरीच प्रशिक्षण दिल, आणि आयएसआय एजंट्सशी ओळख करून दिली. देवेंद्रने भारतीय सैन्याची माहिती आयएसआयला पाठवली. गुजरात पोलिसांनी मोहम्मद मुर्तजा अली याला 16 मे रोजी अटक केली. मुर्तजाने एक ॲप तयार केल होत, ज्याद्वारे तो भारतातील न्यूज चॅनल्सचा डेटा आणि देशातील घडामोडींची माहिती पाकिस्तानला पाठवत होता. त्याच्या बँक खात्यात एका महिन्यात 40 लाख रुपये जमा झाले होते.
हेरगिरीच जाळ कस काम करत होत?
या हेरगिरीचं जाळ खूपच गुंतागुंतीच होत. काही जणांना पैशाच आमिष दाखवल गेल, तर काही जण हनी ट्रॅपमध्ये अडकले. ज्योती मल्होत्रा कंटेंट क्रिएशनच्या नावाखाली पाकिस्तानला जायची, आणि तिच्या ट्रिप्स स्पॉन्सर केल्या जायच्या. तिचे व्हिडिओ लाखो लोक पाहायचे, पण त्यामागे हेरगिरीचा डाव होता.
दानिश हा या रॅकेटचा मुख्य सूत्रधार होता. तो नवी दिल्लीतील पाकिस्तानी हाय कमिशनमध्ये काम करत होता, आणि भारतातील लोकांना हाताशी धरून हे जाळ चालवत होता. ऑपरेशन सिंदूर दरम्यान आणि पुलवामा हल्ल्यापूर्वी हे जाळ सक्रिय झाल होत. पोलिसांनी या प्रकरणात एकूण सात जणांना अटक केली आहे, आणि सर्वजण वेगवेगळ्या मार्गांनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते.
हेरगिरीचा धोका आणि सावधगिरी
भारत-पाकिस्तान तणावादरम्यान हेरगिरीच हे प्रकरण समोर आल्यान एकच खळबळ माजली आहे. ज्योती मल्होत्रा आणि इतर सहा जणांच्या अटकेने हेरगिरीच एक मोठ जाळ उघड झाल आहे. सामान्य माणूस असो वा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, प्रत्येकाला सावध राहण्याची गरज आहे. आपण कोणाशी संपर्कात आहोत, आणि कोणती माहिती शेअर करतोय, याची काळजी घ्यायला हवी. पोलिसांचा तपास अजूनही सुरू आहे, आणि या प्रकरणात आणखी काय समोर येत, हे पाहण महत्त्वाच ठरेल.