सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरात असलेल्या सेंट्रल टेक्स्टाईल या टॉवेल बनवणाऱ्या कंपनीला रविवारी पहाटे भीषण आग लागली. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर आग विझवण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दलाचे काही जवानही जखमी झाले आहेत. ही आग तब्बल 18 तासांहून अधिक वेळ नियंत्रणात येऊ शकली नाही, आणि स्थानिक नागरिकांनी तसेच मृतांच्या नातेवाइकांनी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.
घटनेची सुरुवात – पहाटेची आग आणि हाहाकार
रविवारी पहाटे साधारण 2:45 वाजण्याच्या सुमारास सोलापूरच्या अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरात असलेल्या सेंट्रल टेक्स्टाईल कंपनीतून धुराचे लोळ बाहेर येताना काही स्थानिकांना दिसले. त्यांनी लगेच कंपनीत आग लागल्याच लक्षात घेतल आणि तातडीने अग्निशमन दलाला फोन करून माहिती दिली. साधारण 4 वाजण्याच्या सुमारास एमआयडीसीच्या हद्दीतील अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी पोहोचली.
पण त्यावेळी आग खालच्या मजल्यावरच होती, आणि ती फारशी पसरली नव्हती. तरीही, काही वेळातच आग भडकली आणि संपूर्ण कंपनीत पसरली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. सुरुवातीला त्यांनी फोमचा वापर करून आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण कंपनीच्या छतावर पत्रे असल्यामुळे जवानांना आत जाण्यास अडचणी येत होत्या.
अग्निशमन दलाचं बचावकार्य – अडचणी आणि प्रयत्न
आग वाढत असल्याच पाहून अग्निशमन दलाच्या जवानांनी शिडीच्या साहाय्याने कंपनीच्या वरच्या मजल्यावर जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी धूर खूपच वाढला होता, त्यामुळे त्यांनी बीएसए मटेरियलचा वापर केला. पहाटे 6:30 वाजण्याच्या सुमारास जवानांनी वरच्या मजल्यावरून एका महिलेसह दोन पुरुषांना बाहेर काढल. या तिघांना तातडीने सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
कंपनीत टॉवेल बनवण्याच मोठ्या प्रमाणात सामान होत, आणि साईड मार्जिन नसल्यामुळे जवानांना आत जाण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे जेसीबीच्या साहाय्याने कंपनीची एक भिंत पाडण्यात आली. फोम आणि ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जवान आत गेले, पण धुरामुळे बचावकार्यात अडथळे येत होते.
सोलापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या दहा गाड्यांसह पंढरपूर, अक्कलकोट नगरपरिषद, एनटीपीसी, आणि चिंचोली एमआयडीसी येथूनही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्यासाठी 100 पेक्षा जास्त पाण्याचे बंब वापरले गेले, पण तरीही आग आटोक्यात येत नव्हती.
मालक आणि कुटुंबाचा मृत्यू – हृदयद्रावक प्रसंग
कंपनीचे मालक उस्मानभाई मनसुरी, त्यांचे कुटुंबीय अनस मनसुरी, शिफा मनसुरी, एक वर्षाचा चिमुकला युसूफ मनसुरी, आणि आणखी एक व्यक्ती असे पाच जण कंपनीच्या वरच्या मजल्यावर असलेल्या मास्टर बेडरूममध्ये अडकले होते. रविवारी दुपारी अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर या पाचही जणांना बाहेर काढण्यात यश आल, पण त्यांची प्रकृती अतिशय गंभीर होती. त्यांना तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आल, पण श्वास गुदमरून आणि आगीत होरपळून या पाचही जणांचा मृत्यू झाला.
एका वर्षाच्या चिमुकल्या युसूफला वाचवण्यासाठी त्याची आई शिफा मनसुरी यांनी त्याला कुशीत घेतल होत, पण या भीषण आगीत युसूफचा आईच्या कुशीतच मृत्यू झाला. ही बातमी ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. उस्मानभाई मनसुरी हे सोलापूरमध्ये एक दिलदार व्यक्ती म्हणून ओळखले जायचे, आणि त्यांच्या कुटुंबाचा असा अंत होईल, अस कोणालाच वाटल नव्हत.
आग पुन्हा भडकली – 18 तासांनंतरही नियंत्रण नाही
रविवारी संध्याकाळी आगीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळाल होत, आणि कुलिंगच काम सुरू होत. पण त्याचवेळी आग पुन्हा भडकली, आणि परिसरात भीतीच वातावरण पसरल. तब्बल 18 तासांहून अधिक वेळ लोटला, तरी आग पूर्णपणे नियंत्रणात आली नव्हती. आग विझवताना सोलापूर महापालिकेचे अग्निशमन दलाचे प्रमुख राकेश साळुंखे आणि एक जवान जखमी झाले. या दुर्घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला, आणि त्यांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.
आगीमुळे परिसरात धुराच साम्राज्य पसरल होत, आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, आणि अग्निशमन दलाचे अनेक अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते, पण आगीच नेमक कारण समजू शकल नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिसागर ढोले यांनी सांगितलं की, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, आणि कंपनीत टॉवेल बनवण्याच कच्च माल मोठ्या प्रमाणात असल्याने आग जास्त पसरली.
स्थानिकांचे आरोप – अग्निशमन दल आणि प्रशासनावर प्रश्न
या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि मृतांच्या नातेवाइकांनी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनावर गंभीर आरोप केले. त्यांच म्हणण आहे की, अग्निशमन दलाने सुरुवातीला तत्परतेने कारवाई केली नाही, ज्यामुळे आग जास्त पसरली. एका स्थानिकाने माध्यमांशी बोलताना सांगितल की, जवानांनी पहाटे तीन जणांना एका खोलीतून बाहेर काढल, पण शेजारच्या खोलीत असलेल्या मालक आणि त्यांच्या कुटुंबाला का वाचवल नाही? अग्निशमन दलाकडे आगीपासून बचाव करणारा कॉस्ट्यूम आणि ऑक्सिजन असताना त्यांनी तिथे का गेल नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
याशिवाय, स्थानिक आमदारांचे फोन बंद होते, आणि डीसीपीही उशिरा घटनास्थळी पोहोचले, असंही स्थानिकांनी सांगितल. सोलापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाची सुविधा सुमार असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांच म्हणण आहे की, अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेवर आल्या नाहीत, आणि आल्या तरी त्यांच्याकडे सुरुवातीला फायर कॉस्ट्यूम किंवा अत्याधुनिक यंत्रणा नव्हती. एका स्थानिक व्यक्तीने सांगितल की, अग्निशमन दलाच्या गाडीतल पाणी संपल, आणि नवीन पाणी यायला अर्धा तास लागला, ही कोणती पद्धत आहे? आम्ही महापालिका आयुक्तांकडे तक्रार करणार आहोत, असंही त्यांनी सांगितल.
प्रशासनाला जाग कधी येणार?
सोलापूरच्या अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील ही आग दुर्घटना अनेक प्रश्न उपस्थित करते. आग लागण्याच नेमक कारण काय ? आणि अग्निशमन दलाला आग विझवण्यात का उशीर झाला? सुरुवातीला तीन जणांना वाचवताना शेजारच्या खोलीत असलेल्या मालक आणि त्यांच्या कुटुंबाला का वाचवलं गेल नाही? स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे का? असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत. ही घटना सोलापूरसारख्या औद्योगिक शहरात सुरक्षा व्यवस्थेची कमतरता दाखवते. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य पावल उचलण गरजेच आहे.