बुलढाणा:
जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. सहकार विभागाने आतापर्यंतची सर्वात मोठी आणि कठोर कारवाई हाती घेतली असून, जिल्ह्यातील १३ सहकारी पतसंस्थांची नोंदणी (परवाना) कायमस्वरूपी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे वर्षानुवर्षे फक्त कागदावर जिवंत असलेल्या आणि आर्थिक दिवाळखोरीत निघालेल्या संस्थांना मोठा दणका बसला आहे.
सहकार विभागाचे कठोर पाऊल
गेल्या अनेक वर्षांपासून डबघाईस आलेल्या आणि ज्यांचा आर्थिक डोलारा पूर्णतः कोसळला आहे, अशा संस्थांवर ही कारवाई करण्यात येत आहे. या १३ पतसंस्थांवर यापूर्वीच अवसायक (Liquidators) नेमण्यात आले होते. त्यांच्या मालमत्ता आणि देणी-घेणी यांचय तपासणीनंतर आता या संस्थांचे अस्तित्व कायदेशीररित्या संपवण्यासाठी सहकार विभागाने ‘महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०’ आणि ‘नियम १९६१’ नुसार अंतिम नोटीस बजावली आहे.
या १३ पतसंस्थांचा परवाना होणार रद्द (Blacklist):
सहकार विभागाच्या रडारवर असलेल्या आणि ज्यांची नोंदणी रद्द होणार आहे, त्या १३ पतसंस्थांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१. विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था, बुलढाणा
२. विदर्भ नागरी सहकारी पतसंस्था, बुलढाणा
३. धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, बुलढाणा
४. प्रियदर्शिनी महिला नागरी सहकारी पतसंस्था, बुलढाणा
५. लोककल्याणी महिला नागरी सहकारी पतसंस्था, बुलढाणा
६. पिपल्स अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी, बुलढाणा
७. अहिल्या पगारदार सेवकांची सहकारी पतसंस्था, बुलढाणा
८. शिवप्रताप ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, बुलढाणा
९. सन्मित्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था, बुलढाणा
१०. जि.प. माध्यमिक शिक्षक व कर्मचारी पतसंस्था, बुलढाणा
११. भाग्योदय ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, देऊळघाट
१२. कामेश्वर ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, वरवंड
१३. म. ज्योतिबा फुले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, रायपूर
सभासदांवर काय परिणाम होणार?
अनेक पतसंस्था अवसायनात निघाल्यानंतरही वर्षानुवर्षे त्यांची प्रक्रिया पूर्ण होत नाही. नोंदणी रद्द झाल्यामुळे आता कायदेशीर पेच सुटण्यास मदत होईल आणि सहकार विभागाला पुढील प्रशासकीय कार्यवाही करणे सोपे जाईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र, या कारवाईमुळे सहकार वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून, आर्थिक अनियमितता करणाऱ्या इतर संस्थांनाही यामुळे कडक इशारा मिळाला आहे.
ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ठेवीदार आणि सभासदांपर्यंत ही माहिती पोहोचेल.







